शुक्रवार, ८ मे, २००९

संस्कृत स्तोत्रांना मायबोलीचा साज

गणपती अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, श्रीसुक्त ही संस्कृत भाषेतील स्तोत्रे गेल्या अनेक पिढ्यांपासून घराघरात म्हटली जात आहेत. संस्कृत भाषा आणि त्या भाषेतील ही स्तोत्रे एेकायला खूप छान वाटत असली तरी त्याचा अर्थ समजून आणि ती पाठ करून म्हणणे तस कठीणच. सर्वसामान्य लोकांसाठी असलेली हीच अडचण ओळखून बडोद्याला राहणारे प्रभाकर गोखले यांनी अशा काही निवडक संस्कृत स्तोत्रांना मायबोलीचा साज चढवला आहे. हे केवळ भाषांतर नसून गोखले यांनी ही सर्व स्तोत्रे तालालसुरात म्हणता यावीत, त्यासाठी त्यांना शास्त्रीय रागात बांधले आहे.
गोखले हे मुळचे वाराणशीचे. त्यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. पुढे काशी हिंदू विद्यापीठात त्यांनी स्टेनोग्राफर म्हणून नोकरी केली. तर पुढे अनेक वर्षे विद्यापीठाच्या कुलगुरुंचे सचिव म्हणून काम पाहिले व त्याच पदावरून निवृत्त झाले. अनेक जणांना संस्कृतमधील ही स्तोत्रे म्हणायची असतात, पाठ करायची असतात, पण योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा म्हणायला कठीण गेल्यामुळे ते हे म्हणणे अर्धवट सोटून देतात. हीच अडचण लक्षात घेऊन गोखले यांनी हे काम केले आहे.
गोखले यांनी सगळ्यात पहिल्यांदा गणपती अथर्वशीर्षाचे मराठी रुपांतर केले. ते त्यांनी भीमपलासी रागात बांधले आहे.
नमस्कार ओम गणपती तुजला,
तूच तत्व प्रत्यक्ष प्रमाण
केवळ तूच कर्ता, धर्ता आणि हर्ता
हेची गजत विधान
अशा सोप्या व सहज पाठ होईल अशा मराठी भाषेत गोखले यांनी अथर्वशीर्षाचे मराठी रुपांतर केले आहे.
पुढे गोखले यांनी पुरुषसुक्त, विष्णूसुक्त, विष्णूध्यान, श्रीसुक्त, सप्तशती दुर्गादेवी ध्यान, रुद्र, महिम्न, गंगालहरी, मंत्रपुष्पांजली आदी स्तोत्रे मराठीत आणली आहेत. हे सर्व लोकांना समजायला सोपे व्हावे म्हणून त्यांनी स्वखर्चाने मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचे मराठी रुपांतर असे एक छोटेखानी पुस्तकही प्रसिद्ध केले आहे. तसचे ही सर्व स्तोत्रे रागात बांधून व स्वत गाऊन त्याची सीडीही तयार केली आहे.
शांताकारम् भुजगशयनम हे श्रीविष्णू ध्यान स्तोत्र त्यांनी यमन रागात तर श्रीदेवी ध्यान व श्री सप्तशती दुर्गा स्तोत्र अनुक्रमे बागेश्री व भैरवी रागात बांधले आहे. मंत्रपुष्पांजली ही त्यांनी रागात बांधली आहे.
आपण केलेला हा एक प्रयोग असून त्यात काही त्रुटी असण्याचीही शक्यता आहे. त्याबाबत संगीतप्रेमी व तज्ज्ञ मंडळींनी जरुर मार्गदर्शन करावे, असेही त्यांचे विनम्र सांगणे आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी गोखले यांचा संपर्क दूरध्वनी
०२६५-२५६५३४०/९८२४३३८९४३

३ टिप्पण्या:

  1. मायबोलीवर यांची ऑडिओ सॅम्पल्स द्या ना! मिठाईवाला चवीसाठी मिठाई देतो तशी.

    उत्तर द्याहटवा
  2. मला ही कल्पना आवडली.अर्थ न समजल्याने संस्कुत श्लोक म्हणणे कंटाळवाणे तर होतेच आणि त्याचा योग्य तो परीणामही साध्य होत असेल असे वाटत नाही.शेवटी श्लोक म्हणजे तरी काय,तर स्वतःतल्याच पॉझीटिव्ह शक्तीला आवाहन करणे,त्यामुळे जी भाषा आपल्याला नीट कळते,जे शब्द आपल्या मनापर्यन्त जाऊन पोहचतात तिच भाषा वापरणे योग्य आहे.

    अंजली सुभेदार

    उत्तर द्याहटवा
  3. श्लोक म्हणजे तरी काय,तर स्वतःतल्याच पॉझीटिव्ह शक्तीला आवाहन करणे.

    क्या बात कही?

    उत्तर द्याहटवा