शुक्रवार, २२ मे, २००९

दिवस आकाशवाणीचे... (२)

मुंबई सकाळमधील नोकरी सांभाळून आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात माझे काम सुरु होतेच. आकाशवाणीच्या वृत्तविभागात तेथे काम करणाऱया कॅज्युअल न्युजरिडरला बातम्या करणे व वाचणे अशी दोन्ही कामे करावी लागतात. बातम्या करणे म्हणजे आकाशवाणीने गावोगावी नेमलेले जे वार्ताहर असतात, ते तेथील घडामोडींचे वृत्तांकन तारेद्वारा पाठवत असत. युएनआय आणि पीटीआय या वृत्तससंस्थांच्या बातम्या मशिनद्वारे येत असत. वार्ताहरांनी तारेने पाठवलेल्या बातम्या एकत्र करणे, त्यातील महत्वाच्या बातम्या निवडून ठेवणे, युएनआय-पीटीआयचे टेक शिपाई फाडून आणून देत असे. त्यातून मुंबई किंवा महाराष्ट्राशी संबंधित ज्या काही बातम्या असतील त्या बाजूला काढणे, असे काम असायचे. मग शरद चव्हाण, कुसुम रानडे, ललिता नेने किंवा वृत्तसंपादक हरीश कांबळे आले की त्यांना ते सर्व दाखवत असू. मग ते त्यातील काही महत्वाच्या बातम्या करायला सांगत असत. मग त्या वार्ताहरांनी पाठवलेल्या तारेच्या किंवा युएनआय/पीटीआयच्या असायच्या.


आकाशवाणी किंवा दूरदर्शनसाठी बातम्या या मोजक्या शब्दांत लिहणे आवश्यक असते. उगाचच फाफटपसारा तेथे चालत नाही. वाक्ये लहान, छोटी आणि सुटसुटीत असावी लागतात. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे लिहिताना ते केलं, झालं, सांगितलं, अशा बोली भाषेत लिहायचे असते. सुरुवातीला असे लिहायची सवय नव्हती. मग हळूहळू ती झाली. मी मुंबई सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून नोकरी करत असल्याने मला तेथे वृत्तपत्रीय भाषेत लिहिण्याची सवय होती. आकाशवाणीवर काम करताना ती बदलावी लागली. पण दोन्हीकडे काम करताना नेमके भान कसे ठेवायचे, हे सरावाने जमत गेले. पुढे पुढे पाच मिनिटे आणि दहा मिनिटांच्या बातम्यांसाठी किती बातम्या तयार कराव्या लागतात, त्याचे गणितही कळले व जमायला लागले. सुरुवातीला तिघे ज्येष्ठ वृत्तनिवदेक असल्याने बातम्या तयार केल्यानंतर त्या त्यांना दाखवणे, त्यांनी तपासून देणे, बातम्यांचा क्रम लावून देणे आणि संध्याकाळच्या प्रादेशिक बातम्यांसाठी संपूर्ण बुलेटीन लावून देणे (यात पहिले पान ठळक बातम्यांचे, नंतर पहिल्या पाच मिनिटांच्या बातम्या, त्यानंतर या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येत आहेत, असे वाचायचा कागद, त्यानंतर उर्वरित पाच मिनिटांच्या बातम्या व शेवटी ठळक बातम्यांचा कागद) असे सर्व तयार करून देत असत.


पुढे माझ्या त्या दीड-दोन वर्षांच्या काळातच हे तिघेही ज्येष्ठ वृत्तनिवेदक निवृत्त झाले. त्यामुळे त्यानंतर दोन कॅज्युअल न्यूजरिडरवरच सर्व भार होता. या ज्येष्ठ मंडळींनी अगोदर केलेल्या मार्गदर्शनामुळे ते नसतानाही आम्हाला बुलेटीन तयार करणे जणू लागले. जयंत माईणकर, रत्नाकर तारदाळकर, धनश्री लेले, मनाली दीक्षित, अंजली आमडेकर, दीपक वेलणकर (काही जणांची नावे राहिली असल्यास क्षमस्व),अशी आम्ही नवी-जुनी कॅज्युअल मंडळी त्यावेळी होतो. आकाशवाणीचा माईक हा खूप शक्तीशाली असल्याने कागदाची साधी सळसळ झाली तरी ती श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे बातम्यांच्या कागदाचा गठ्ठा हातात घेऊन एकेक बातमी वाचून झाल्यावर तो कागद अलगद बाजूला कसा सरकावायचा किंवा अलगद बसल्या जागेवरून खाली कसा टाकून द्यायचा, हे धडे नेने बाईंकडून मिळाले. सुरुवातीला तर त्या बातम्या देत असताना कशा देतात, हे पाहण्यासाठी खाली स्टुडिओत मी गेलो असल्याचेही मला आठवताय.


आकाशवाणीच्या दिवसांची ही सुरुवात कशी झाली ते सांगितले पाहिजे. मुंबई सकाळमध्येच नोकरी करत असताना (१९९०)च्या सुमारास मुंबई आकाशवाणीसाठी स्टाफ अनाऊन्सर पाहिजे, अशी जाहिरात वृत्तपत्रातून आली होती. मला या क्षेत्राची आवड असल्यामुळे मी अर्ज केला. चर्चगेटच्या के. सी. महाविद्यालयात त्याची लेखी परीक्षा झाली. काही हजारात उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यातून काही जणांची आवाजाच्या परीक्षेसाठी माझी निवड झाली. आवाजाच्या चाचणीतूनही उत्तीर्ण होऊन अंतिम निवडीसाठी सात जण निवडले गेले होते, त्यात मी होतो. पण त्यावेळी माझी निवड झाली नाही. तेव्हा रजनीकांत राणे व दिनेश अडावदकर याची निवड झाली. माझी तेव्हा आकाशवाणीवर निवड झाली असती तर मुंबई सकाळ सोडून अनाऊन्सर म्हणून जायची मी तयारी ठेवली होती. पण नाही निवड झाली. मात्र त्यावेळी आकाशवाणीवर कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून काम करणाऱया श्रीराम केळकर, विजय कदम, दीपक वेलणकर आदींशी ओळख/मैत्री झालेली होती. त्यामुमळे कधी रिपोर्टींगच्या निमित्ताने चर्चगेट, नरिमन पॉइंट या भागात मी गेलो की आवर्जून या मित्रांना भेटायला जात असे. पुढे प्रादेशिक वृत्त विभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी आकाशवाणीशी पूर्णपणे जोडला गेलो.


मगाशी सांगितले की स्टाफ अनाउन्सरच्या जागेसाठी माझी निवड झाली नाही. पण नंतर काही महिन्यांत प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून निवड झाल्यामुळे आकाशवाणी जवळून पाहता आली. काम करण्याचा खूप अनुभव मिळाला. मला या क्षेत्रात कायमचे काम करायला नक्कीच आवडले असते. त्याच काळात कोल्हापूर, सांगली, पुणे आदी आकाशवाणी केंद्रांसाठी निवेदक/वृत्तनिवेदक पाहिजे, अशा जाहिराती वृत्तपत्रातून आल्या होत्या. मी त्या त्या ठिकाणी जाऊन लेखी परीक्षा, आवाजाची चाचणीही देऊन आलो. अगदी तिकडे माझी निवड झाली असती तर मी जायची तयारी ठेवली होती. परंतू लेखी परीक्षा, आवाजाची चाचणी उत्तीर्ण होऊनही अंतिम निवडीत मी नव्हतो. कदाचित तेव्हा त्यांनी स्थानिकानाच प्राधान्य दिले असेल. पण माझे प्रयत्न सुरुच होते. अशातूनच एकदा आकाशवाणीच्या नभोनाट्य विभागाच्या आवाजाची परीक्षा मी दिली. पण पहिल्या प्रयत्नात फेल झालो. आकाशवाणीच्या नभोनाट्यातून काम करायचे असेल तर आकाशवाणीची स्वराभीनय चाचणी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नसले तरी पुन्हा काही महिन्यांनंतर जी स्वऱाभीनय चाचणी झाली त्यात मी यशस्वी झालो. मला बी ग्रेड मिळाली होती. त्यानंतर गिरिजा कीर यांच्या याला जबाबदार कोण या नभोनाट्यात मला भूमिका करायची संधीही मिळाली. तनुजा कानडे या तेव्हा मराठी नभोनाट्य विभागाच्या निर्मात्या होत्या. पण मला तेवढे ते एकच नभोनाट्य करायला मिळाले.


एकंदरीत आकाशवाणीचे हे दिवस खूप मजेचे व नवीन नवीन शिकण्याचे होते. खूप चांगला अनुभव त्यातून मला मिळत होता. अजूनही अशाच काही आठवणी आहेत, त्या उद्या तिसऱया भागात...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा