सोमवार, ४ मे, २००९

मोबाईल धारकांसाठी खुषखबर

मोबाईल ही आता चैन राहिली नसून ती गरज झाली आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी भारतात जेव्हा मोबाईल सेवा सुरू झाली तेव्हा आपल्या सर्वाना त्याचे काय अप्रुप होते. मोबाईलच्या किंमती आणि इनकमिंग व आऊटगोईंग कॉलसाठी असणारे शु्ल्क हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहरचे होते. ठराविक लोकांच्या हातातच मोबाईल दिसत असे. त्यातही लोकल ट्रेन किंवा रस्त्यात कोणाचा मोबाईल वाजला की सर्वजण त्या माणसाकडे वेगळ्या नजरेने पाहात असत. आणि तो मोबाईलधारकही आपण जणू काही सारे जग जिंकले आहे, अशा थाटात वागत असे. त्याकाळात मोबाईल घेणे परवडत नसल्याने सर्वसामान्यांकडे तेव्हा पेजर होते. कमरेला लटकावलेले पेजर त्यावेळी अनेकांकडे होते. मात्र हळूहळू मोबाईलच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील इतक्या खाली आल्या. वजनाने जड आणि बेंगरुळ वाटणारे मोबाईल हॅण्डसेट सुबक व स्टाईलीश झाले. मोबाईल म्हणजे केवळ फोन करणे व घेणे इतक्या पुरताच मर्यादित न राहता त्यात कॅमेरा, एमपीथ्री, ब्लुटुथ, जीपीआरएस, मल्टिमिडीया आणि अनेक सोयी उपलब्ध झाल्या. त्यात रिलायन्सने कर लो दुनिया मुठ्ठीमे म्हणत त्याच्या किंमती इतक्या कमी केल्या की भाजीवाले, प्लबंर यांनाही मोबाईल घेणे सहज शक्य झाले.
मोबाईलच्या तंत्रज्ञानात सुरुवातीला जीएसएम सिस्टीमचेच मोबाईल होते. पुढे रिलायन्स, टाटा आणि अन्य कंनन्यांनी प्रवेश करून सीडीएमए तंत्रज्ञानाचे मोबाईल आणले. या व्यवसायात जणू काही मोबाईल युद्ध सुरू झाले. नवनवीन कंपन्या आणि त्यांच्या आकर्षक ऑफर्सची भूरळ ग्राहकांना पडू लागली. कधी या कंपनीचे नेटवर्क खूप चांगले तर अमुक कंपनीचे वाईट, असा अनुभव ग्राहकांना यायला लागला. मोबाईलवर बोलत असताना फोन कट होणे, फोन न लागणे, नेटवर्क जाणे अशा तक्रारी ग्राहकांकडून यायला लागल्या. यातून एका कंपनीची मोबाईल सेवा बदलून दुसऱया चांगल्या कंपनीची सेवा घ्यायची असेल तर नंबर बदलला जाण्याचे दुष्टचक्र ग्राहकांच्या पाठीस लागत होते. त्यामुळे अमुक एक कंपनी नको म्हणून दुसऱया मोबाईल कंपनीचे सीमकार्ड घेतले तर मोबाईल बदलल्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना नवीन नंबर कळवणे हे मोठे कामच असायचे. यातून ग्राहकाने मोबाईल कंपनी बदलली तरी त्याचा मोबाईल क्रमांत तोच राहावा, अशी मागणी जोर धधरू लागली. केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडून त्यावर चर्चा सुरु होती. आता लवकरच म्हणजे येत्या सप्टेंबरपासून मोबाईल कंपनी बदलली तरी मोबाईल क्रमांक कायम (जुना आहे तोच) सोय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
या सेवेला नंबर पोर्टेबिलिटी सेवा म्हणून ओळखले जाणार असून याचा पहिला टप्पा येत्या २० सप्टेंबरपासून लागू केला जाणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकोता या मुख्य शहरांबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांत ही सेवा सुरू होणार आहे. या सेवेमुळे ग्राहकाने मोबाईल ऑपरेटर कंपनी बदलली तरी आता पूर्वीसारखा त्याचा क्रमांक न बदलता कायम राहणार आहे. अर्थात त्यासाठी ग्राहकाला सुरुवातीला एकदाच काही शुल्क मोजावे लागणार आहे असून ते सर्वसामान्य मोबाईल ग्राहकांनाही सहज परवडण्यासारखे असणार आहे. त्यामुळे ग्राहक ते खुषीने देतील.
आत्तापर्यंत मोबाईल ऑपरेटर कंपन्यांची जी दादागिरी होती ती या निमित्ताने मोडून निघणार आहे. एखाद्या मोबाईल ऑपरेटर कंपनीच्या सेवेबाबत ग्राहक समाधानी नसेल तर त्याला कोणतीही काळजी न करता आणि मोबाईल क्रमांक बदलला न जाता, दुसऱया मोबाईल ऑपरेटर कंपनीची सेवा घेता येणार आहे.
अर्थात असे जरी असले तरी त्याची अंमलबजावणी जाहीर केल्याप्रमाणे खरोखऱच होते की नाही, मोबाईल ऑपरटेर कंपन्या त्याला कसा प्रतिसाद देतात, त्यात काही खोडा घालत नाही ना आणि केंद्र शासन या बाबत किती निर्धाराने व वेगाने याचा पाठपुरावा करते यावर ते अवलंबून राहील.

२ टिप्पण्या:

  1. मला आठवतेय सगळ्यात पहिल्यांदा मी मोबाईल घेतला तेंव्हा इनकमींग ८ रू. प्रती/मिनीट तर आऊटगोईंग १६ रु. प्रती/मीनीट. होते.
    नंबर बदलावा लागेल म्हणुन कित्तेक जण सर्व्हिस बदलत नाहित, नाखुश असले तरी. या सुवीधेने खरंच सगळ्यांचे कल्याण होईल.

    उत्तर द्याहटवा
  2. अनिकेत,
    नमस्कार
    तुमच्या प्रमाणेच अनेक जणांनी केवळ मोबाईल नंबर बदलेल म्हणून ऑपरेटर कंपनी बदलली नाही, आता या सुविधेमुळे ती सोय नक्की होईल.
    सध्या तुमची क्रमश दीर्घकथा/कादंबरी सुरू आहे का, दोन भाग वाचले. पुढे काय होणार त्याची उत्सुकता तुम्ही कायम ठेवली आहे.
    शेखर

    उत्तर द्याहटवा