रविवार, ३ मे, २००९

राजकीय भाग्ययोग

ज्योतिषशास्त्र किंवा भविष्यकथन हे शास्त्र आहे की नाही या विषयावर असलेला वाद हा न संपणारा आहे. या विषयावर दोन्ही बाजूचे समर्थक तावातावाने बोलत असतात. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे विद्यापीठातून ज्योतिषशास्त्र हा विषय शिकवण्यावरून मोठा वाद झाला होता. मात्र असे असले तरी प्रत्येकालाच आपल्या भविष्याविषयी उत्सुकता असते. आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार, ते जाणून घ्यावे असे सर्वानाच वाटते. काही जण उघडपणे हे औत्स्युक्य दाखवतात तर काही लपूनछपून आपली भविष्य जाणून घेण्याची हौस पूर्ण करून घेतात. सर्वसामान्य माणसांच्या भविष्याप्रमाणेच राजकीय पक्ष, देश, राजकीय नेते यांचेही भविष्य वर्तवले जात असते. नुकत्याच आपल्याकडे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. देशात मतदानाचे अजून दोन टप्पे बाकी असल्याने सर्व निवडणुकांचे निकाल येत्या १६ मे रोजी जाहीर होणार आहेत. मतदानाच्या यंत्रातून नेमके काय बाहेर निघेल, कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, केंद्रात कोणता पक्ष सत्तेवर येईल, पुढचा पंतप्रधान कोण असेल, त्या विषयी सर्वसामान्यांप्रमाणेच राजकीय नेते, राजकीय पक्ष यांना उत्सुकता आहे. वेगवेगळे ज्योतिषी आपले अंदाज व भविष्य वर्तवत असतात. कधी हे भविष्य खऱे ठरते तर कधी नाही. मात्र या भविष्याविषयी सर्वानाच उत्सुकता असते, हे मात्र नक्की. हीच उत्सुकता लक्षात घेऊन लोकसत्ताच्या ३ मे २००९ च्या लोकरंग पुरवणीत कुंडलीतील रोजयोग हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.
या लेखात ज्योतिषी आप्पा पुंडलीक, सिद्धेश्वर मारटकर, श्रीराम भट, पं. विजय जकातदार, वि.शं. आष्टेकर या ज्योतिषांचे लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. लेखांसोबत कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, तिसरी आघाडी, शिवसेना या राजकीय पक्षांसह मनमोहन सिंह, सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी, शरद पवार, रागुल गांधी, मायावती, प्रणव मुखर्जी यांच्या कुंडली देण्यात आल्या आहेत. ज्योतिषविषयाचे विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्यासाठी त्या संग्राह्य व उपयुक्त ठरतील.
आप्पा पुंडलीक यांचा लेख मोठा असून त्यांनी कॉंग्रेस आघाडीचे अल्पजीवी सरकार या लेखात प्रमुख राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांच्या पत्रिकेतील ग्रहयोग व त्यांचे भविष्य वर्तवले आहे. तर श्रीराम भट यांनी धक्कादायक निकालांचे तडाखे या लेखात महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक असतील, मोठे दिग्गज पराभूत होतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीन ते पाच जागा मिळतील, असे भविष्य सांगितले आहे.
सिद्धेश्वर मारटकर यांनी कॉंग्रस व तिसऱया आघाडीचे संयुक्त सरकार या लेखात मायावती, शरद पवार, शिवसेना या पक्षांसह राजकीय भविष्य वर्तवले आहे. आष्टेकर यांनी कॉंग्रेसमध्ये गेले तरच शरद पवार पंतप्रधान होतील, या लेखात पवार यांनना सध्याची ग्रहदशा पंतप्रधान बनवू शकते, असे म्हटले आहे. बसपचा हत्ती सत्तेच्या गजगामिनीमागे कितीही वेगाने पळत गेला तरी या घटकेला दिल्ली गाठू शकत नाही, असे भाकीतही आष्टेकर यांनी वर्तवले आहे.तर जकातदार यांनीही कॉंग्रेस आघाडीचे सरकार या लेखात कॉंग्रेस (आय)ला सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळे पंतप्रधान त्याच पक्षाचा होईल. मनमोहन सिंह हे या पदाचे प्रमुख दावेदार असतील. दुसऱया क्रमांकाच्या प्रमुख नेत्यासाठी पुन्हा उपपंतप्रधानपद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
प्रत्येक ज्योतिषाचे भाकीत, भविष्य हे वेगवेगळे आहे. कुंडली जर एकच असेल तर प्रत्येकाचे भविष्यही एखच का नाही, असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. त्याला एक उत्तर असे की डॉक्टरांच्या निदानाबाबत नाही का असे होत, प्रत्येक डॉक्टर आपले वैद्यकीय ज्ञान व अनुभवाच्या जोरावर जसे रुग्णाच्या बाबतीत निदान करतो, तसेच या ज्योतिषांचे असू शकते. काही पारंपरिक ज्योतिषी तर काही कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीने आपले अंदाज वर्तवत असतात. त्यामुळे असे होऊ शकते.
अर्थात कोणाचे भविष्य किती खरे ठरते, हे येत्या १६ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर कळणारच आहे. ज्या मंडळींना या विषयाची उत्सुकता असेल किंवा जे ज्योतिषाचे अभ्यासक असतील त्यांनी हे राजकीय भविष्य सविस्तर वाचण्यासाठी ३ मे २००९ ची लोकसत्ताची लोकरंग पुरवणी किंवा थेट www.loksatta.com या संकेतस्थळावर जाऊन हा लेख वाचावा.

1 टिप्पणी:

  1. I really don't understand and certainly don't believe this astrological predictions. Nobody in this world has achieved with the help of advise from astrologers. However, people are very much inclined to seek what is in their future. By knowing the future from their stars does not gain. They can't change their future. Hence Loksatta has wasted their Sunday supplement by giving predictions of soem famous astrologers about future status of Indian Parliament. Do you agree with me?
    Mangesh Nabar

    उत्तर द्याहटवा