शनिवार, ९ मे, २००९

देहदान शंका-समाधान

आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही दान हे सर्वश्रेष्ठ मानण्यात येते. अन्न, वस्त्र किंवा वस्तू स्वरुपातील दान हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून करत आलो आहोत. कालानुरुप यात बदल झाले. संक्रांत किंवा तत्सम सणाच्या वेळी देण्यात येणाऱया वाणाचीही संकल्पना बदलली. सध्याच्या काळात रक्तदान या दानाला खूप महत्व आहे. याचा बऱयापैकी प्रसारही झाला आहे. मात्र आता त्याच बरोबर नेत्रदान, त्वचादान आणि देहदानलाही अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले हे शरीर आणि शरीराचे अवयव दुसऱया व्यक्तीसाठी उपयोगी पडले तर त्यासारखे अन्य पुण्य नाही. दान केलेली त्वचा भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर शस्त्रक्रियेद्वारे लावता येऊ शकते. अंधाला डोळे मिळाल्यामुळे तो जग पाहू शकतो तर संपूर्ण देह वैद्यकीय शाखेच्या विद्याथ्याना अभ्यासासाठी उपयोगी पडू शकतो. रक्तदान जेवढ्या प्रमाणात स्वीकारले गेले, तेवढ्या प्रमाणात अद्यापही देहदानाचा प्रसार झालेला नाही. डोंबिवलीतील दधीची देहदान मंडळ देहदान, रक्तदान आणि त्वचादानासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे.
मंडळातर्फे देहदान शंका व समाधान या नावाचे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून पाच वर्षांपूर्वी पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. पुराणकाळातील दधीची ऋषींचे नाव सर्वाना माहिती आहे. वृत्रासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी श्रीविष्णूच्या सांगण्यावरून या ऋषींनी आपली हाडे देवांना दिली होती. या ऋषींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्राने त्या राक्षसाचा वध करता येईल, असे सांगण्यात आले होते. दधीची ऋषीनी आपल्या अस्थी देऊन देवांची इच्छा पूर्ण केली होती, अशी एक पौराणिक कथा आहे. जगातील पहिला देहदाता आणि इच्छामरणी असलेल्या या ऋषींचे नाव मंडळाला देण्यात आले आहे. पुण्याचे दिवंगत ग. म. सोहनी यांनी मरणोत्तर देहदानाचा प्रसार आपल्या हयातीत केला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन डोंबिवलीतील गुरुदास तांबे यांनी याचा प्रचार-प्रसार करण्याचे व्रत घेतले. स्वेच्छा निवृत्तीनंतर त्यांनी स्वतचा देहदानाचा अर्ज भरून दिला. १९८८ मध्ये या कामाचा प्रसार करण्यासाठी दधीची देहदान मंडळाची स्थापना केली. गेल्या काही वर्षांत मंडळातर्फे डोंबिवली, कल्याण, ठाणे, कळवा, अंबरनाथ, बदलापूर, मुंबई आदी ठिकाणांहून देहदान व नेत्रदानासाठी हजारो लोकांकडून अर्ज भरून घेण्यात आले आहेत. तर १५५ देहदान झाले आहे. (ही आकडेवारी जुनी असून त्यात आणखी भर पडली आहे)
दधीची देहदान मंडळाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात या विषयाचा समग्र आढावा घेण्यात आला असून मनातील शंका, समज-गैरसमज यांना समर्पक उत्तरेही देण्यात आली आहेत. मंडळाचे कार्य, मरणोत्तर देहदान-गरज कायद्याची, नेत्रदान, शासनाचे डोळे कधी उघडणार, महाराष्ट्रातील नेत्रपेढ्या, देहदात्यांच्या वारसांकडून मंडळाची अपेक्षा, ठाण्यातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, देहदानाबाबत सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व त्याची उत्तरे, या संदर्भातील लोकांचे अनुभव, डॉक्टरांचा सहभाग, अवयव दानाबाबत असलेले समज-गैरसमज, अवयवदान कायदा, त्वचादान का आणि कसे करावे, इच्छामरण, स्वेच्छामरण, देहदानाची चळवळ आणि मान्यवरांचे गैरसमज, या संदर्भातील आवश्यक ते अर्ज, वैद्यकीय महाविद्यालये, त्यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक आदी भरपूर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी
गुरुदास तांबे-९५२५१-२४९०७४० (डोंबिवली), बाळकृष्ण भागवत-२८६९८११४ (बोरिवली), सुरेश तांबे-९५२५१-२४५३२६६ (डोंबिवली), श्रीराम आगाशे-२५३०५९१६ (ठाणे), उमाकांत रेवाळे-९५२५१-२६७०६१२ (बदलापूर), सुधीर भिडे-९५२५१-२६९५२१४ (बदलापूर)

६ टिप्पण्या:

  1. छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. आवर्जून प्रतिक्रिया कळवल्याबद्दल आभार. या विषयाचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे.
    शेखर

    उत्तर द्याहटवा
  3. शेखर,
    तुमचे आर्टिकल पेपरमधे पण वाचतो. आणि तुम्ही तर प्रोफेशनल लेखक. त्यामुळे आर्टीकल नेहेमीच अगदी छान आणि मुद्देसुद असते. तसेच दिलेली माहिती पण नेहेमी सुसंगत असते.

    उत्तर द्याहटवा
  4. छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
    I second what Mahendra has said.

    उत्तर द्याहटवा
  5. मी कधीपासून याबद्दल शोध घेत होतो. जर पुण्यात कोणी अधिक माहितीसाठी उपलब्ध असेल तर टिप्पणीने कळवावे.

    -- प्रशांत

    उत्तर द्याहटवा
  6. देहदान के अभियान को सलाम
    युग दधिची देहदान अभियान कानपूर की सह संयोजिका श्रीमती माधवी सेंगर पत्नी श्री मनोज सेंगर संयोजक युग दधिची देहदान अभियान कानपूर ने अपनी माँ श्रीमती सोंदायी देवी की पार्थिव देह ३१-०१-२००१० को जी एस वी एम् मेडिकल कॉलेज कानपुर को समर्पित कर कथनी और करनी को साबित कर दिया.उनके इस जज्वे को मेरा सलाम. लोगो को इस अभियान से जुड़कर समाज के चिकित्सीय सहयोग के लिए आगे आना चाहिए!!!!!

    उत्तर द्याहटवा