गुरुवार, ७ मे, २००९

आठवणीतील भावगीते

मराठी संगीतात भावगीतांना एक अनन्यसाधारण महत्व आहे. भावगीतांचा उल्लेख आणि विचार केल्याशिवाय मराठी सुगम संगीत पुढे जाऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वीच मराठी भावगीतांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारे ज्येष्ठ गायक गजाननराव वाटवे यांचे निधन झाले. त्यावेळी बहुतांश वृत्तपत्रातून त्यांच्या जीवनकार्याचा जो परिचय प्रसिद्ध झला, त्यात भावगीतांना त्यांनी जी प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला, त्याबद्दलल बरेच लिहिले गेले आहे. खरेच मराठी संगीतासाठी आणि संगीतप्रेमी रसिक, गायक, संगीतकार, कवी यांच्यासाठी तो काळ सुवर्णकाळ होता. अनेक प्रतिभावान संगीतकार, कवी आणि गायकांनी अजरामर केलेली भावगीते आजही आपल्या स्मरणात आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राने याच भावगीतांच्या सुवर्णकाळाला पुन्हा एकदा उजाळा देण्याचे काम हाती घेतले आहे.
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून म्हणजे पूर्वीचे मुंबई ब केंद्र गेल्या ५ मे पासून भावगीतांचा सुवर्णकाळ ही मालिका सुरू झाली आहे. दर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. मराठी भावगीतांना खऱया अर्थी लोकप्रिय केले तर ते आकाशवाणीनेच. याबद्दल कोणाचेही दुमत होणार नाही. आज भावगीतांच्या क्षेत्रात आपल्याला मोठी झालेली जी नावे दिसून येतात, त्यांच्या उमेदीची सुरुवात आकाशवाणीवूनच झाली होती. यशवंत देव, मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे आणि अनेक मंडळी आकाशवाणीवर नोकरी करत होती. त्यावेळी त्यांनी एखापेक्षा एक अशी सरस गाणी तयार केली की आज इतक्या वर्षांनंतरही ती रसिकांच्या ओठावर आहेत.
पी. सावळाराम, दशरथ पुजारी,हदयनाथ मंगेशकर, गंगाधर महांबरे, सुधीर फडके, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, लता मंगेशकर, आशा भोसले, माणीक वर्मा, सुमन कल्याणपूर, अशोक पत्की, नंतरच्या पिढीतील अनुराधा पौडवाल आणि अशा कितीतरी नावे सांगता येतील. (काही नावे राहिली असल्यास चूकभूल देणे घेणे) या सर्वानी मराठी भावगीतांमध्ये आपले स्वताचे असे स्थान निर्माण केले आहे. आकाशवाणीवरून त्या काळात या मंडळींची अनेक भावगीते सादर झाली. पुढे ती लोकप्रिय झाल्यानंतर प्रथितयश रेकॉर्ड व कॅसेट कंपन्यांकडून त्या गाण्यांच्या रेकॉर्डही तयार करण्यात आल्या. मराठी भावसंगीत लोकप्रिय करण्यात आकाशवाणीचे मोठे योगदान आहे. मराठी भावगीतांसाठी आकाशवाणीवर भावसरगम नावाचा कार्यक्रमही अनेक वर्षे प्रसारित होत होता. (आता तो होतो की नाही माहिती नाही) दर आठवड्याला एक कवी आणि त्याची गाणी या कार्यक्रमातून सादर केली जायची. मंगेश पाडगावकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, हदयनाथ मंगेशकर आणि अनेकांची गाजलेली गाणी सर्वप्रथम आकाशवाणी वरूनच सादर झाली होती. अरुण दाते यांचे अत्यंत गाजलेले आणि ज्या गाण्यामुळे त्यांचे मूळचे नाव विसरून लोक त्यांना अरुण दाते म्हणुनच ओळखायला लागले ते शुक्रतारा मंदवारा हे गाणे आकाशवाणीवरुनच पहिल्यांदा सादर झाले होते.
मराठी भावगीतांचा हा सुवर्णकाळ भावी पिढीने जोपासावा, त्यात नवीन भर घालावी, पूर्वसुरीनी जे काम केले आहे, त्याची नव्या पिढीला किमान ओळख तरी व्हावी या मुख्य उद्देशाने आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात भावगीतांच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेले आणि आत्ता हयात असलेले कवी, गायक-गायिका, संगीतकार यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या मंडळींचे अनुभव, गाण्यांचे किस्से, गप्पा आणि या विषयाशी संबंधित जुन्या आठवणी या कार्यक्रमातून उलगडल्या जाणार आहेत. कार्यक्रमाची निर्मिती भुपेंद्र मिस्त्री यांची आहे.
भावगीतांची आवड असणाऱया संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम म्हणजे स्मरणरंजन तर नवीन पिढीसाठी मराठी भावसंगीताचा अमोल ठेवा उलगडून दाखवणारा मार्गदर्शक असणार आहे. तेव्हा दर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम नक्की एेका.

३ टिप्पण्या:

  1. Very true. Specially Gajanan Watave hyanchi bhavgite faar gaajali. Rachana hi sadhya sopya ani prasadik hotya ani sangit hi titekch changle hote tya mule gaani faar lokapriya zali.

    उत्तर द्याहटवा
  2. भावगीते हा आपल्याला मिळालेला अमूल्य ठेवा आहे. कधीही कुठेही ऐका खूप छान वाटते. ति.स्व.वाटवेंचे निधन झाले त्यादिवशी खूप वाईट वाटले. माझी आई सांगते, एक काळ असा होता की नाशिकला वाटवेसाहेब आणिक काही मंडळी मेनरोडवर गात असत. भर रस्त्यात उभे राहून गात व लोकही तिथेच उभे राहून ऐकत असत.
    छान लिहीले आहे.

    उत्तर द्याहटवा