बुधवार, २० मे, २००९

कधी रे येशील तू...

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्यानं संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त झाला आहे, माणसंच काय, पण झाड, झुडप, प्राणी, पक्षी आणि अगदी धरित्रीही तुझी आतुरतेने वाट पाहात आहे. प्रत्येकजण विचारत आहे, आळवत आहे, कधी रे येशील तू, वरुणराजा कधी रे येशील तू...

यंदाच्या वर्षी तर संपूर्ण राज्यभर सूर्यदेवाच्या कोपामुळे तापमापकाचा पारा चाळीस अंशाच्या मार्चमध्येच गेला होता. एप्रिल गेला, मे महिनाही सरत आला. तसा तू दरवर्षी सात जूनला येतोस, पण एखाद्या व्रात्य मुलाने दोन-चार दिवस शहाण्यासारख वागावं आणि मग पुन्हा त्याच्या अंगात यावं, असाच तू वागतोस. सात जूनला तू आपली हजेरी लावतोस आणि नंतर जो कुठे गायब होतोस, तो अख्खा जून संपून जुलै उजाडला तरी तोंड दाखवत नाहीस. मला आठवताय, पूर्वी तू कसा अगदी शहाण्यासारखा यायचास, आलास की चार महिने मुक्काम करायचास, पण आता मात्र तुला आमचा सहवास आवडत नाही का, की तू आमच्यावर रागावला आहेस, मला माहीतेय, की तुला यायला उशीर होतो त्याला आम्हीच जबाबदार आहोत.

आमच्या परिसरातील, गावातील, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील नैसर्गिक संपत्तीची आम्हीच पूर्णपणे वाट लावून टाकली. विकासाच्या नावाखाली आम्ही जंगले नष्ट केली, हिरवेगार डोंगर उघडे-बोडके केले, छोट्या-मोठ्या टेकड्या आम्हीच उध्वस्त करून टाकल्या, सोसायटी, घरे यांना मातीचे अंगण ठेवले नाही, सगळीकडे सिमेंट-क्रॉंक्रिटचे जंगल उभं केलं, तुझ्या येण्यासाठी सहाय्यभूत असलेले वारा आणि ढग यांना अडवणारे मोठे डोंगर आता राहिले आहेत कुठे, आकाशातून सहस्त्रधारांनी जमिनीकडे धाव घेणारा तुझा खळाळता प्रवाह पूर्वी नदी, नाले आणि समुद्रातून मुक्तपणे हिंडत होता. पण आम्हीच नतद्रष्टानी तेथे समुद्रात भराव टाकून बॅक बे रेक्लमेशन तयार केले, नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमणे करून, बेकायदा इमारती आणि झोपड्या बांधून आम्ही तुझा खळाळता प्रवाहही बंदिस्त करून टाकला, नदीतून स्वच्छ वाहणरे पाणी आम्हीच कारखान्यातील रासायनिक द्रव्ये सोडून दुषित करून टाकले, आमचे अपराध तरी किती सांगू...

मात्र याचा वचपा तू कधीतरी काढतोस, कधी असा काही दणका देतोस, की पावसाळा म्हटला की मुंबईकरांना दरवर्षी २६ जुलै २००५ ची आठवण होते, त्यावेळी तू असा की बरसलास की संपूर्ण मुंबईची पार वाट लावून टाकलीस, अर्थात त्याला आम्ही आणि येथील नालायक राज्यकर्तेच जबाबदार होतो. मात्र इतके होऊनही आम्ही त्यापासून काहीच धडा घेतलेला नाही. मिठी नदी आणि अन्य नदी पात्रातील बेकायदा बांधकामे हटविण्याचे नाटक आम्ही पार पाडले, मिठी नदीच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आणि बरचे काही, पण गेली इतकी वर्षे आम्ही जाणूनबूजून निसर्गावर, पर्यावरणावर जे काही अत्याचार केले त्याची भरपाई इतक्या जुजबी आणि तात्पुरत्या उपायांनी होऊ शकते, नाही, पण आम्ही ते करत राहतो.

आजच विविध वृत्तपत्रातून बातमी वाचली की तू अंदमानला येत्या ४८ तासांत आपली हजेरी देणार आहेस, अरे संपूर्ण महाराष्ट्र तुझ्याकडे डोळे लावून बसला आहे. आता एक काम कर, वृत्तपत्रांची ही बातमी आणि वेधशाळेचा अंदाज यावेळी तरी खोटा पाटू नकोस, अंदमानात ठरलेल्या वेळेपूर्वीच ये. कारण अंदमानात तू आलास की त्यानंतर सात दिवसात मुंबईत आणि नंतर काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात तू मुक्कामाला येतोस, असा अनुभव आहे. त्यामुळे ये अगदी लवकर ये,

आम्ही तुझे अनंत अपराधी असलो तरी महाराष्ट्रातील भावी पिढीसाठी तू वेळेवर ये, आमचे अपराध पोटात घाल, पण येणाऱया भावी पिढीला आमच्या अपराधांची शिक्षा देऊ नकोस, या वर्षी थंडी गायब झाली होती. मला तर अशी भीती वाटते की या थंडीसारखा तू सुद्धा गायब होशील की काय, मग तसे झाले तर काय होईल त्याची कल्पनाच करवत नाही. भावी पिढीला तुला व्हिडिओ किंवा सीडीमध्येच पाहावा लागेल की काय, की पूर्वी नैसर्गिकरित्या पाऊस पडत असे, यावरच कोणाचा विश्वास बसणार नाही, ढगांमध्ये रासायनिक द्रव्यांची फवारणीकरून कृत्रीमपणेच तूला बोलवावे लागेल का, बदलते व ढासळते पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा होणारा ऱहास आणि अन्य काही कारणांमुळे ऋतूचक्र असेच बदलत किंवा संपत जाणार असल्याचा धोका शास्त्रज्ञानी वर्तवला आहेच आणि त्यात तू वेळेवर आला नाहीस तर त्याकडेच वाटचाल सुरू झाली की काय, असे आम्हाला वाटत राहील.

अरे माणसांप्रमाणेच धरित्रीच्या कणाकणालाही आता तुझी आस लागली आहे. भेटी लागे जीवा, लागलीसे आस, अशी आम्ही प्रत्येकाची अवस्था झाली आहे. तेव्हा आता उशीर करू नकोस, केवळ घनघनमाला नभी दाटल्या असे न करता त्यातून जोरदार धारा कोसळू दे, आता अधिक अंत पाहू नकोस, ये, धावून ये, पुन्हा एकदा तुला विचारतोय, कधी रे येशील तू...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा