बुधवार, २७ मे, २००९

ग्राहक हक्काचा विजय

ग्राहक म्हणून आपल्याला काही हक्क मिळाले आहेत. आपण आपल्याला मिळालेल्या या हक्कांचा योग्य वापर केला, ग्राहक म्हणून आपले कर्तव्य बजावले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा चिकाटीने पाठपुरावा केला तर ग्राहकांना गृहीत धरणाऱया बड्या उद्योजकांना आणि व्यापाऱयांनाही दणका देता येऊ शकतो. मात्र त्यासाठी आपली नकारात्मक वृत्ती सोडून दिली पाहिजे. माझ्या एकट्याने काय होणार आहे, जाऊ दे, त्यात काय, असे न म्हणता आपल्यावर अन्याय झाला असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. तसे जर केले तर अंतिम विजय सत्याचाच होतो, हे नुकत्याच एका निकालाने दाखवून दिले आहे.


लोकसत्ताच्या २७ मे २००९ च्या अंकात पहिल्या पानावर जयंत धुळुप यांनी दिलेली, १५ रुपयांची पाण्याची बाटली २५ रुपयांना, कामत हॉटेल व धारीवाल इंडस्ट्रीला ग्राहक मंचाचा दणका ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. ग्राहक चळवळीत काम करणाऱयांसाठी आणि ग्राहकांनी योग्य मार्गाने लढा दिला तर त्याला त्याचा हक्क मिळू शकतो, असे या बातमीने दाखवून दिले आहे. सर्व ग्राहकांसाठी ही बातमी प्रेरणादायी आहे.


आजकाल पाण्याची बाटली विकत घेणे सर्रास झाले आहे. बंद बाटलीतील हे पाणी वेगवेगळ्या किंमतीला विकले जाते, असा आपला नेहमीचा अनुभव. असाच अनुभव प्रल्हाद पाडळीकर या ग्राहकाला आला. सर्व ठिकाणी १५ रुपयांना विकली जाणारी धारीवाल इंडस्ट्रीजची अॅक्सरीच हा पाण्याची बाटली विठ्ठल कामत हॉटेलमध्ये २५ रुपयांना विकली जात होती. पाडळीकर यांनी या प्रकरणी रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. आणि ग्राहक मंचाने हॉटेलचे संचालक विठ्ठल कामत व धारीवाल इंडस्ट्रीजचे संचालक रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांना या प्रकरणी दोषी ठरवले आहे. शारिरीक व मानसिक त्रासापोटी आणि न्यायालयाच्या खर्चापोटी या दोघांनी पाच हजार रुपये ४५ दिवसांच्या आत तक्रारदार पाडळीकर यांना द्यावेत. व स्वताचा खर्च स्वतच सोसावा. या आदेशाचे पालन केले नाही तर ही रक्कम द.सा. द. शे. ८ टक्के व्याज दराने वसूल करण्याचा अधिकार पाडळीकर यांना राहील, असा अंतिम निकाल मंचाचे अध्यक्ष आर. डी. म्हेत्रस व सदस्य बी. ए. कानिटकर यांनी दिला आहे. बाजारात उपलब्ध किंमतीपेक्षा जादा किंमत लावून ती बाटली विकू नये, असेही या आदेशात म्हटले आहे.


२३ जानेवारी रोजी पाडळीकर आपल्या दोन सहकाऱयांसह विठ्ठल कामत हॉटेलमध्ये थांबले होते. न्ह्याहरीचे पदार्थ आणि ही पाण्याची बाटली असे १४५ रुपये काउंटरवर भरून त्यांनी कुपन्स घेतली. खाताना त्यांचे लक्ष पाण्याच्या बाटलीकडे गेले. त्यावर त्याची किंमत २५ रुपये आणि स्पेशली पॅक्ड फॉर कामत हॉटेल, असे छापलेले त्यांना दिसले. प्रत्यक्षात या पाण्याच्या बाटलीची किंमत पंधरा रुपयांच्या आसपास असताना येथे २५ रुपये का, असा प्रश्न पाडळीकर यांच्या मनात आला. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाकडे विचारण केली. त्याने दिलेल्या उत्तराने पाडळीकर यांचे समाधान झाले नाही. त्यांनी धारीवाल इंडस्ट्रीजच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे चौकशी केली. मात्र त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. कामत व धारीवाल हे दोघेही संगमनत करून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरत आहेत आणि बेकायदेशीरपणे बेहिशोबी आर्थिक फायदा करून घेत आहेत, असे पाडळीकर यांचे म्हणणे होते. त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. पाडळीकर यांच्यातर्फे अॅड. संजीव जोशी व अॅड. सचिन जोशी यांनी काम पाहिले. ग्राहक मंचाने पाडळीकर यांचे म्हणणे मान्य करून उपरोक्त निकाल दिला.


आपल्यालाही असे अनुभव अनेकदा येत असतात. मात्र आपण कामाच्या गडबडीत असतो म्हणून किंवा जाऊ दे, नसता वाद हवाय कशाला, मागितलेत तेवढे पैसे देऊन टाकू, असे म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. यामुळेच व्यापारी, दुकानदार आणि उद्योजकांचे फावते. पाडळीकर यांच्या सारखा एखादा जागरुक ग्राहक अशा मंडळींना भेटतो आणि ग्राहक मंचाचा दणका त्यांना मिळतो. या अशा बातम्या ग्राहकांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात. आता ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन विठ्ठल कामत व धारीवाल यांनी केले आहे की नाही, त्याचीही बातमी धुळुप यांनी द्यावी.


ग्राहक म्हणून आपल्याला जसे काही हक्क आणि अधिकार आहेत, तशीच आपली काही कर्तव्येही आहेत. हक्क आणि अधिकारांबरोबरच आपण सगळ्यानीच आपल्या कर्तव्याची जाणीव विसरता कामा नये. अशा प्रकारे जर व्यापारी, दुकानदार यांच्याकडून अव्वाच्या सव्वा किंमत लावून किंवा अन्य प्रकारे लुबाडणूक होत असेल तर आपण त्याविषयी आवाज उठवला पाहिजे. इथे पाडळीकर यांनी एकट्याने हे केले. आपल्यापैकी कोणाला एकट्याने करणे शक्य नसेल तर सामूहिकपणे असे पाऊल उचलायला पाहिजे. ग्राहक एकजुटीचा आणि शक्तीचा असा विधायक कामासाठी उपयोग केला पाहिजे.

२ टिप्पण्या:

  1. माझ्याकडे एक सॅमसंग कंपनीची वॉशिंग मशिन आहे. तिच्या रिपेअर्स चा एक मोठा एपिसॊड आहे. त्या मशिनचं सॉफ्ट वेअर खराब झालं म्हणुन कंपनीच्या मेकॅनिकने ३५०० रुपयांचे कोट केले होते. शेवटी त्या कंपनीच्या एम डी ला रोज मेल आणि फॅक्स पाठवून हे काम करुन घेतलं होतं..डिटेल्स लिहिन मग ब्लॉग वर माझ्या एखाद्या दिवशी..

    उत्तर द्याहटवा
  2. महेंद्र कुलकर्णी,
    नमस्कार
    आपलाही अनुभव जरुर लिहून काढा. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा ग्राहकाने जर चिकाटीने पाठपुरावा केला तर त्यात यश मिळतेच, हे या निमित्ताने लोकांना समजेल.
    आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा